पदोन्नतीमुळे वाढलेल्या रिक्त पदांचा प्रश्न मार्गी; स्थायी समितीच्या मंजुरीनंतर जाहिरात प्रसिद्ध होणार
कल्याण विभागीय (विजयकुमार पाटील) : मुंबई महापालिकेच्या (बीएमसी) सचिव विभागातील अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या शिपाई पदांच्या भरतीला अखेर गती मिळणार आहे. विभागातील सुमारे ४० ते ५० रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने ऑनलाइन प्रक्रियेद्वारे भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.
मागील काही वर्षांत सचिव विभागातील अनेक शिपाई कर्मचारी पदोन्नती मिळून नाईक, हवालदार आणि जमादार पदावर रुजू झाले आहेत. परिणामी, शिपाई संवर्गातील मनुष्यबळात मोठी घट झाली असून सध्या विभागात केवळ आठ ते नऊ शिपाई कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
रिक्त पदांमुळे विभागाच्या दैनंदिन कामकाजावर मोठा ताण निर्माण झाला आहे. विशेषतः महापालिकेच्या विविध समित्यांच्या बैठका आणि कार्यक्रमांच्या पत्रिका संबंधित सदस्यांपर्यंत पोहोचविण्याच्या कामासाठी पदोन्नती मिळालेल्या नाईक, हवालदार आणि जमादार यांनाही अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत.
याशिवाय, सध्या कार्यरत असलेल्या शिपायांवरही अतिरिक्त कामाचा भार पडत असून, अतिकालीन भत्त्याची मुदत संपल्यानंतरही त्यांना नियमितपणे अधिक वेळ काम करावे लागत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर सचिव विभागाने शिपाई संवर्गाच्या सरळसेवा भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, निवडीचे निकष आणि कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर अधिकृत भरती प्रक्रिया सुरू होणार असून ऑनलाइन अर्ज मागविण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
महापालिकेतील रिक्त पदे भरली गेल्यास सचिव विभागातील कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत मिळेल, तसेच विद्यमान कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त कामाचा ताणही कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचे या भरती प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.
