मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धेला दोन भामट्यांनी बनविले लक्ष्य; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद, शहर पोलिसांकडून तपास सुरू
धुळे (सुनील निकम) : धुळे शहरात अंधश्रद्धा आणि भीतीचा आधार घेत ७२ वर्षीय वयोवृद्ध महिलेची फसवणूक करून तब्बल आठ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलेला घरावर मोठे संकट आणि मुलाच्या जीवाला धोका असल्याची भीती दाखवत दोन अज्ञात भामट्यांनी बोलण्यात गुंतवले आणि तिच्याकडील दागिने घेऊन पसार झाले. या संपूर्ण घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिल परिसरातील सुरतवाला बिल्डिंगजवळील जगदंबा हौसिंग सोसायटीत राहणाऱ्या प्रतिभा प्रकाश कुलकर्णी (वय ७२) या नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. जिल्हा न्यायालय परिसरात पोहोचल्यानंतर दोन अज्ञात इसमांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले.
यानंतर त्यांनी संवाद साधत कुलकर्णी यांना त्यांच्या घरावर मोठे संकट आले असून मुलाच्या जीवावरही धोका असल्याचे सांगितले. हा अनर्थ टाळण्यासाठी धार्मिक विधी करावा लागेल आणि त्यासाठी अंगावरील सर्व सोन्याचे दागिने काही वेळासाठी काढून द्यावे लागतील, असे सांगून त्यांनी वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला.
दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून प्रतिभा कुलकर्णी यांनी अंगावरील सुमारे आठ तोळे सोन्याचे दागिने त्यांच्याकडे दिले. त्यानंतर भामट्यांनी त्यांना “५१ पावले पुढे जा आणि मागे वळून पाहू नका,” असे सांगितले. काही अंतर चालल्यानंतर संशय आल्याने त्यांनी मागे वळून पाहिले असता दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मोठी गर्दी जमली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अशा फसवणुकीच्या प्रकारांपासून सावध राहावे, असेही पोलिसांनी नमूद केले आहे. दरम्यान, पीडित प्रतिभा कुलकर्णी यांनी घडलेल्या प्रकाराचे वर्णन करताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू आहे.
