Spread the love

हेल्मेटधारकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान; ट्रक चालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून दिले

भुसावळ (संघरत्न सपकाळे) तालुका प्रतिनिधी : वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने भुसावळ तालुका पोलीस स्टेशनतर्फे कुऱ्हा आणि दीपनगर येथे ‘अपघातमुक्त जनजागृती अभियान’ राबविण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमाला वाहनचालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कुऱ्हा येथे आयोजित कार्यक्रमात रिक्षाचालक, दुचाकीस्वार तसेच इतर वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन, वेगमर्यादेचे महत्त्व, हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर तसेच सुरक्षित वाहनचालक म्हणून असलेली जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या अभियानातील विशेष आकर्षण म्हणजे नियमित हेल्मेटचा वापर करणाऱ्या वाहनचालकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. पोलिसांच्या या अभिनव उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सुरक्षित वाहनचालक बनण्याचा सकारात्मक संदेश पोहोचला.

दरम्यान, दीपनगर येथे ट्रक, बल्कर आणि मालवाहतूक वाहन चालकांची विशेष ‘कॉर्नर मिटिंग’ घेण्यात आली. या बैठकीत वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे, मद्यपान करून वाहन न चालविणे, निर्धारित वेगमर्यादेचे पालन करणे, वाहनांची आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे तसेच धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक न करणे याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.

रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केवळ पोलीस प्रशासन नव्हे तर प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. नियमांचे काटेकोर पालन केल्यास अनेक मौल्यवान जीव वाचू शकतात, असा संदेशही या अभियानातून देण्यात आला. भुसावळ तालुका पोलिसांच्या या जनजागृती उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले असून, अशा मोहिमा नियमितपणे राबविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version