Spread the love

प्रतीक महाजन व आवेश गवली यांच्या अकाली निधनाने दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर; परिसरात हळहळ

भुसावळ तालुका प्रतिनिधी (संघरत्न सपकाळे) : भुसावळ शहरावर रविवारी दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळला. वेगवेगळ्या घटनांमध्ये तापी नदी आणि वाघूर धरणात बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गंगाराम प्लॉट येथील १६ वर्षीय प्रतीक अनिल महाजन आणि गवळीवाडा परिसरातील २२ वर्षीय आवेश गफार गवली यांच्या अकाली निधनाने संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून दोन्ही कुटुंबांवर काळाने घाला घातला आहे.

तापी नदीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
गंगाराम प्लॉट परिसरातील रहिवासी अनिल सुखदेव महाजन यांचा मुलगा प्रतीक अनिल महाजन हा आपल्या मित्रांसोबत तापी नदीवर फिरण्यासाठी गेला होता. दुपारी सुमारे १२.३० वाजेच्या सुमारास नदीत उतरलेला प्रतीक अचानक खोल पाण्यात गेल्याने बुडाला. ही घटना लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

प्रतीकने नुकताच अकरावी इयत्तेत प्रवेश घेतला होता. अभ्यासू, शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे तो मित्रपरिवारात लोकप्रिय होता. त्याच्या अकाली निधनाने महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गंगाराम प्लॉट परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.

वाघूर धरणात आवेश गवलीचा दुर्दैवी अंत
दुसऱ्या घटनेत भुसावळच्या गवळीवाडा परिसरातील २२ वर्षीय आवेश गफार गवली याचा वाघूर धरणात बुडून मृत्यू झाला. आवेश आपल्या दोन मित्रांसह धरण परिसरात फिरण्यासाठी गेला होता. त्यानंतर तिघेही आंघोळीसाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्याच्या खोलीचा अचूक अंदाज न आल्याने आवेश खोल पाण्यात जाऊन बुडाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आवेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

दोन घरांतील आनंद क्षणात हिरावला
या दोन स्वतंत्र दुर्घटनांमुळे भुसावळ शहरात हळहळ व्यक्त होत आहे. एका कुटुंबाने उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने पाहणारा विद्यार्थी गमावला, तर दुसऱ्या कुटुंबाने उमदा आणि तरुण युवक कायमचा गमावला.

दोन्ही कुटुंबांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिक शोकसागरात बुडाले असून या दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नदी व धरण परिसरात फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेषतः युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी पाण्याच्या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही विविध स्तरांतून करण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version