Spread the love

शाळेच्या पहिल्याच दिवशी नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम; गणवेश, वह्या-पुस्तके आणि दप्तरांचेही वितरण

धुळे | प्रतिनिधी : उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारपासून धुळे जिल्ह्यातील सर्व शाळांची घंटा पुन्हा एकदा वाजली. शाळेच्या पहिल्याच दिवशी धुळे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ८ मध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. धुळे महानगरपालिकेचे उपायुक्त हेमंत निकम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, तर पहिलीच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या, पुस्तके आणि दप्तरांचेही वितरण करण्यात आले.

शाळेत प्रवेश करताच झालेल्या या प्रेमळ स्वागतामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. दीड ते दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर शाळेत परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. विशेष म्हणजे, शिक्षकांनीही स्वखर्चातून विद्यार्थ्यांसाठी दप्तरांची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

धुळे महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार शहरातील सर्व मनपा शाळांमध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी विविध अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून शाळा क्रमांक ८ येथे हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.

यावेळी बोलताना उपायुक्त हेमंत निकम यांनी सांगितले की, यंदा मोठ्या संख्येने पालकांनी महानगरपालिका शाळांवर विश्वास दाखवत आपल्या पाल्यांचे प्रवेश घेतले आहेत. हा विश्वास कायम राखण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी त्यांना सकारात्मक वातावरण मिळावे, या उद्देशाने स्वागत व साहित्य वितरणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आनंदी चेहऱ्यांनी आणि पालकांच्या समाधानाने शाळेच्या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version