Spread the love

एल-निनोच्या संभाव्य परिणामाच्या पार्श्वभूमीवर बोरी मध्यम प्रकल्पातील जलसाठ्याचा आढावा; पाणीटंचाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

पारोळा | प्रतिनिधी : बोरी मध्यम प्रकल्पावर अवलंबून असलेल्या पारोळा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आगामी काळात निर्माण होऊ नये, यासाठी आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी शहराला आवश्यक असलेले पिण्याचे पाणी आरक्षित ठेवण्याबाबत तसेच उपलब्ध जलसाठ्याचे प्रभावी नियोजन करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान जलसंपदा विभागाकडून प्राप्त माहितीनुसार यंदा एल-निनो परिस्थितीचा संभाव्य परिणाम लक्षात घेता पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. त्यानुसार बोरी मध्यम प्रकल्पातून पारोळा शहरासाठी आवश्यक पाणी आरक्षित ठेवण्यात आले असून, भविष्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

बैठकीत बोरी मध्यम प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा, आगामी पावसाळ्यापूर्वीची परिस्थिती, पाणीपुरवठा व्यवस्थापन तसेच आपत्कालीन नियोजनाचा सखोल आढावा घेण्यात आला. शहरातील नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश आमदार अमोलदादा पाटील यांनी दिले.

या बैठकीस लोकनियुक्त नगराध्यक्ष दादासाहेब चंद्रकांत बी. पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनिषभाऊ पाटील, नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती मनोजभाऊ जगदाळे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक दिपकभाऊ अनुष्ठाण, उपगटनेते तथा नगरसेवक पंकजभाऊ मराठे, बोरी मध्यम प्रकल्पाचे उपअभियंता सिद्धार्थ पाटील, तामसवाडी शाखा अधिकारी प्रीतम काकडे, नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता सुमित पाटील, पाणीपुरवठा अभियंता संकेत कारले यांच्यासह संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून नियोजनबद्ध पद्धतीने काम करून पारोळा शहरातील नागरिकांना भविष्यात पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळेत राबविण्यात येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version