Spread the love

बसवर मार्गफलक नसल्याने गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य नसल्याची तक्रार; दुपारच्या उन्हात प्रवाशांची तारांबळ

अमळनेर (ललित सातपुते) प्रतिनिधी : अमळनेर बसस्थानकातील अव्यवस्थेमुळे विशेषतः वयोवृद्ध नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार समोर येत आहे. बसवर स्पष्ट मार्गफलक नसणे आणि कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने प्रवाशांची गैरसोय वाढत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

मंगळवारी दुपारच्या वेळेत बसस्थानकावर निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत निंदनीय असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दहा पेक्षा अधिक बसगाड्यांवर गंतव्यस्थानाचे नावच प्रदर्शित करण्यात आले नव्हते, तर किमान पाच ते दहा गाड्यांवर केवळ ‘अमळनेर’ असेच लिहिलेले असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

काही बसमध्ये नावाची घडी दुमडून किंवा तात्पुरत्या स्वरूपात फलक लावण्याचा प्रयत्न केल्याने नेमकी कोणती बस कोणत्या मार्गावर जाणार आहे, याची माहिती मिळणे कठीण झाले. परिणामी अनेक प्रवासी, विशेषतः वयोवृद्ध नागरिक, भर उन्हात एका बसमधून दुसऱ्या बसकडे धावपळ करताना दिसून आले.

याशिवाय, बस कोणत्या मार्गावर जाणार याबाबत विचारणा केल्यावर काही कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचीही तक्रार प्रवाशांनी केली. त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.

प्रवाशांनी एसटी प्रशासनाकडे बसवर स्पष्ट आणि ठळक मार्गफलक लावणे, वेळापत्रकाची प्रभावी माहिती देणे तसेच कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना आवश्यक मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली आहे. विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बसस्थानकातील व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version