Spread the love

सराफ बाजार परिसरातील धक्कादायक प्रकार; जागरूक नागरिकामुळे आर्थिक नुकसान टळले, सतर्क राहण्याचे आवाहन

अमळनेर | प्रतिनिधी : अमळनेर शहरातील सराफ बाजार व पानखिडकी परिसरात बनावट अधिकारी बनून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीने सरकारी अधिकारी असल्याचा आव आणत एका कुटुंबाचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला आणि “मी तुमच्या खात्यात ₹२५,५०० जमा करतो, ते दुसऱ्या क्रमांकावर पाठवा,” असे सांगून आर्थिक फसवणुकीचा डाव आखल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने अधिकारी पोषाख परिधान करून एका कुटुंबाच्या घरी अचानक भेट दिली. घरातील विजेची उपकरणे, इतर साहित्य तसेच कुटुंब प्रमुखाची माहिती विचारून त्याने स्वतःची ओळख सरकारी अधिकारी म्हणून निर्माण केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक घेत काही वेळाने फोन करून जुनी ओळख असल्याप्रमाणे संवाद साधत विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला.

यानंतर त्याने “तुमच्या खात्यात ₹२५,५०० जमा करतो, ते पैसे माझ्या सांगितलेल्या दुसऱ्या क्रमांकावर पाठवा,” अशी मागणी केली. काही वेळातच पैसे जमा झाल्याचा संदेशही संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर आला. मात्र, खात्याची प्रत्यक्ष पडताळणी केल्यानंतर एकही रुपया जमा झालेला नसल्याचे स्पष्ट झाले.

सुदैवाने संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात शून्य शिल्लक असल्याने सायबर ठगाचा डाव फसला आणि संभाव्य आर्थिक नुकसान टळले. प्राथमिक माहितीनुसार, प्राप्त झालेल्या संदेशावर “वशीम” हे नाव दिसून आले, तर पैसे पाठविण्यास सांगितलेल्या मोबाईल क्रमांकाशी “अदील” हे नाव जोडलेले असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती देऊ नये, खात्यात पैसे जमा झाल्याचा संदेश आला तरी स्वतः बँक बॅलन्स तपासावा, तसेच ओटीपी, यूपीआय पिन किंवा इतर गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. संशयास्पद कॉल किंवा व्यवहार आढळल्यास तातडीने पोलीस किंवा सायबर हेल्पलाइनकडे तक्रार नोंदविण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत शहरातील लोकप्रतिनिधींनी संबंधित यंत्रणांकडे तक्रार करून अशा बनावट अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही पुढे येत आहे.

“सावध नागरिक, सुरक्षित शहर” या संदेशासह नागरिकांनी सतर्क राहून सायबर फसवणुकीपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version