Spread the love

भंडारी टाकी परिसरातील घटना; अग्निशामक दलाने आगीवर मिळवले नियंत्रण, लाखो रुपयांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज

शिरपूर | प्रतिनिधी : शिरपूर शहरातील भंडारी टाकी परिसरात एका फळांच्या गोडाऊनला दुपारच्या सुमारास भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. या आगीत गोडाऊनमधील फळसाठा, एक दुचाकी तसेच संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारी टाकी परिसरातील अशपाक बागवान यांच्या मालकीच्या फळांच्या गोडाऊनला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने धुराचे मोठे लोट परिसरात पसरले आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच शिरपूर अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशामक दलाने अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत गोडाऊनमधील फळांचा मोठा साठा, मोटारसायकल आणि इतर संसारोपयोगी साहित्य आगीत भस्मसात झाले होते. या घटनेत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, संबंधित गोडाऊनमधील वीजपुरवठा गेल्या तीन महिन्यांपासून खंडित असल्याची माहिती मालक अशपाक बागवान यांनी दिली. त्यामुळे आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. आग लागण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित प्रशासन आणि अग्निशमन विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version