Spread the love

सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोप; तरुणांचे व्यसनमुक्त भवितव्य आणि ‘दारूमुक्त गाव’साठी पोलिसांकडे निवेदन

धरणगाव (विनोद मोरे) प्रतिनिधी :  गुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वंजारी-खपाट गावात सुरू असलेला अवैध हातभट्टी दारूचा व्यवसाय तातडीने आणि कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले आहे. गावातील सामाजिक वातावरण बिघडत असून तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली.

गावातील नागरिक व महिलांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अवैध हातभट्टी दारूच्या विक्रीमुळे गावातील अनेक युवक तसेच अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्यावर तसेच भविष्यातील आयुष्यावर गंभीर परिणाम होत असून काही घटनांमध्ये जीवितहानी झाल्याचाही दावा ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी अनेक कुटुंबांवर आर्थिक आणि सामाजिक संकट निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करून गावातील अवैध हातभट्टी दारूचा व्यवसाय पूर्णपणे बंद करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

यावेळी वंजारी गावाचे पोलीस पाटील दिलीप साळवे, खपाट गावाचे पोलीस पाटील गरबळ अहीरे, वंजारी गावाचे सरपंच शंकर पाटील, माजी सरपंच डॉ. दीपक पाटील, तुषार चौधरी, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर काकडे, राजेश महाजन, युवासेना अध्यक्ष सुभाष बोरसे, गोपाल महाजन यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

“दारूमुक्त गाव, सुरक्षित गाव” या संकल्पनेतून ग्रामस्थांनी प्रशासनाने अवैध दारूविक्रीविरोधात कठोर आणि प्रभावी कारवाई करून गावात व्यसनमुक्त व सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version