स. न. झंवर विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण
पाळधी | प्रतिनिधी : “विद्यार्थ्यांनी शाळेत आल्यानंतर आपल्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे आणि मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहावे. संस्थेचे माजी विद्यार्थी आज देश-विदेशात विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या यशाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती साधावी,” असे आवाहन स. न. झंवर विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष सुनील झंवर यांनी केले.
पाळधी येथील स. न. झंवर विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेचा परिसर रंगीबेरंगी फुगे, आकर्षक रांगोळ्या आणि तोरणांनी सजविण्यात आला होता. दीर्घ सुट्टीनंतर मित्र-मैत्रिणींना भेटल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता.
पाचवीत प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपसरपंच निसार देशमुख, उद्योगपती अनिल कासट, शालेय समितीचे अध्यक्ष सुनील झंवर, मुख्याध्यापक एस. पी. पाटील आणि पर्यवेक्षक एस. एस. मणियार उपस्थित होते.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी भावना भोसले आणि केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले तसेच शाळेतील विविध उपक्रमांची पाहणी केली.
सुनील झंवर यांनी पालकांनाही आवाहन करताना सांगितले की, आपल्या पाल्याने शाळेत दिलेले अध्ययन आणि गृहपाठ नियमितपणे पूर्ण केला आहे की नाही, यावर पालकांनी बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच शिक्षकांनीही विद्यादानाचे पवित्र कार्य समर्पित भावनेने पार पाडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहावे.
कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करून आणि सामूहिक राष्ट्रगीताने करण्यात आला. विशेष म्हणजे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती आणि शिक्षकांचा उत्साह लक्षवेधी ठरला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभांगी बागले यांनी केले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
