७ ते ८ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर ३० ते ३२ कोटींची सामुदायिक पाणीपुरवठा योजना साकार; उर्वरित भागातही एक-दोन दिवसांत नियमित पाणीपुरवठा
जामनेर (चेतन रोकडे) प्रतिनिधी : अनेक वर्षांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या पहूर पेठ, पहूर कसबे आणि परिसरातील ग्रामस्थांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. सात ते आठ वर्षांच्या सातत्यपूर्ण संघर्षानंतर वाघुर धरणाचे पाणी गावात दाखल झाले असून या ऐतिहासिक क्षणामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज गावात पोहोचलेले वाघुरचे पाणी हा केवळ पाणीपुरवठ्याचा टप्पा नसून दीर्घकाळ सुरू असलेल्या जनसंघर्षाचा आणि ग्रामस्थांच्या संयमाचा विजय मानला जात आहे. उन्हाळा सुरू होताच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती. प्रत्येक घरासमोर टंचाईचे संकट उभे राहत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी सातत्याने केली जात होती.
ही समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. असंख्य बैठका, प्रस्ताव आणि प्रशासकीय पाठपुराव्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांतून सुमारे ३० ते ३२ कोटी रुपयांच्या सामुदायिक पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली.
योजना मंजूर झाल्यानंतरही विविध तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय प्रक्रियांमुळे प्रत्यक्ष काम पूर्ण होण्यासाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागला. मात्र आता या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून वाघुर धरणाचे पाणी गावात पोहोचल्याने ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. सध्या पहूर कसबे परिसरातील काही भागात नियमित पाणीपुरवठा सुरू झाला असून उर्वरित भागातही येत्या एक ते दोन दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
गावाच्या विकासासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून अनेक वर्षांपासूनचे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. पाणीटंचाईमुक्त भविष्यासाठी या योजनेमुळे मोठा दिलासा मिळणार असून हा दिवस संपूर्ण परिसरासाठी ऐतिहासिक ठरल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
