Spread the love

RPF कार्यालयात मध्यरात्रीची घटना; गंभीर जखमी जवानाला धुळे येथे हलविले, कारण अद्याप अस्पष्ट

ललित सातपुते अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर रेल्वे स्थानक परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. रेल्वे संरक्षण दल (RPF) मधील जयपाल नामक जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ही घटना मंगळवारी मध्यरात्री सुमारे १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान रेल्वे स्थानक परिसरातील RPF कार्यालयात घडल्याचे समजते. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित जवानाने शासकीय शस्त्रातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडल्याचे सांगितले जात आहे. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच सहकाऱ्यांनी आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने धाव घेत जखमी जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

उपचार प्रक्रियेदरम्यान डॉ. अनिल शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती समोर आली आहे. सध्या संबंधित जवानावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक, मानसिक किंवा इतर कोणत्या कारणामुळे हा टोकाचा निर्णय घेण्यात आला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसून संबंधित यंत्रणांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात आणि सुरक्षा विभागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणामागील नेमकी कारणे स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version