जीपीएस स्कूल कॅम्पस, पाळधी येथे महाराणा प्रताप जयंती व राष्ट्रमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
पाळधी/धरणगाव/जळगाव।
हिंदू सूर्य, वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त जीपीएस स्कूल कॅम्पस, पाळधी येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोन्ही महान विभूतींच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, महाराणा प्रताप हे शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचे जिवंत प्रतीक होते. मातृभूमीच्या रक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली नाही. त्यांचे जीवन आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संदेश देणारे आहे.
तसेच राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी सांगितले की, जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि न्यायनिष्ठेचे संस्कार दिले. त्यांच्या दूरदृष्टी, त्याग आणि कर्तृत्वामुळेच स्वराज्याची भक्कम पायाभरणी झाली. समाजाला योग्य दिशा देणारे त्यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. “महाराणा प्रतापांचा स्वाभिमान आणि जिजाऊंचे संस्कार हा आपल्या इतिहासाचा अमूल्य वारसा आहे. या दोन्ही महान विभूतींचे विचार अंगीकारणे हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास शाळेचे चेअरमन विक्रम पाटील, जीपीएस स्कूल कॅम्पसचे समन्वयक डी. डी. कंखरे, कॉलेजचे प्राचार्य अजिंक्य जोशी, नरेंद्र मांडगे, नवलसिंग पाटील, बंडूदादा नारखेडे, शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राचार्य अजिंक्य जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन जीपीएस स्कूलचे समन्वयक डी. डी. कंखरे यांनी मानले.
