Spread the love

परीक्षा किंवा मुलाखत नाही; गुणांच्या आधारे थेट निवड, अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ३० जून

शहादा | प्रतिनिधी (संजय मोहिते)

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील महिलांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली असून, एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी, म्हसावद यांच्या अधिपत्याखालील विविध अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीस पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही नियुक्ती एकत्रित मानधन तत्त्वावर सरळ पद्धतीने करण्यात येणार असून पात्र व इच्छुक महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेत शहादा तालुक्यातील कलमाडी, वडगाव, आसुस, जवखेडा, उंटावद, खेडदिगर आणि बाबदेवपाडा या महसुली गावांमधील प्रत्येकी एका अशा एकूण सात अंगणवाडी मदतनीस पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

अर्जदार महिला उमेदवार किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून ती संबंधित अंगणवाडी केंद्र असलेल्या गावाची, वाडीची किंवा वस्तीची स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे. यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याचा रहिवासी दाखला तसेच स्वयंघोषणापत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक राहणार आहे.

उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. विधवा महिलांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. वयाच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. शासनाच्या नियमानुसार उमेदवाराला दोनपेक्षा जास्त हयात अपत्ये नसावीत तसेच त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे वाचन व लेखनाचे ज्ञान असणेही अनिवार्य राहणार आहे.

या भरती प्रक्रियेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांनी सादर केलेल्या शैक्षणिक व इतर पात्रता कागदपत्रांच्या आधारे शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार गुणांकन केले जाईल. बारावीचे गुण, पदवी, पदव्युत्तर शिक्षण, डी.एड./बी.एड., संगणक पात्रता, विधवा किंवा अनाथ प्रवर्ग, मागासवर्गीय आरक्षण तसेच अनुभव या बाबींच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.

अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १६ जून २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत सुरू राहणार असून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज कार्यालयीन वेळेत स्वतः उपस्थित राहून बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, प्रकल्प म्हसावद, ता. शहादा, जि. नंदुरबार येथे सादर करावेत. अंतिम मुदतीनंतर किंवा पोस्टाद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. दरम्यान, ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने आणि गुणवत्तेच्या आधारे राबविण्यात येणार असून कोणत्याही अफवा किंवा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी सागर चौधरी यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version