Spread the love

पावसाळ्यापूर्वी नदीपात्रातील अडथळे हटवण्याचे युद्धपातळीवर काम; स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित नशिराबादच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

नशिराबाद | धीरज सैतवाल । प्रतिनिधी

नशिराबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कृतीशील नेतृत्वाची ओळख निर्माण करणारे नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील (पिंटू शेठ) यांच्या विशेष पुढाकाराने अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या वाकी नदीच्या स्वच्छता मोहिमेला सध्या वेग आला आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराला संभाव्य पूरस्थितीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी नदीपात्रातील गाळ, कचरा आणि अडथळे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह सुरळीत राहावा, शहरात पाणी साचून नागरिकांना त्रास होऊ नये तसेच नदीपात्र स्वच्छ आणि सुरक्षित राहावे, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. नगराध्यक्ष योगेश पाटील स्वतः प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन कामांचा आढावा घेत असून संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देत आहेत.

नशिराबादच्या विकासासाठी बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर देणारी कार्यशैली हे नगराध्यक्ष योगेश पाटील यांचे वैशिष्ट्य ठरत आहे. प्रसिद्धीपेक्षा विकासकामांना प्राधान्य देत वेळेत आणि गुणवत्तापूर्ण काम पूर्ण व्हावे, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे नागरिकांचे मत आहे.

वाकी नदी स्वच्छता मोहिमेमुळे परिसराचा चेहरामोहरा बदलू लागला असून नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे. शहरातील पर्यावरण संवर्धनासोबतच पूरनियंत्रणाच्या दृष्टीनेही ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

याबाबत नगराध्यक्ष योगेश (पिंटू शेठ) पाटील म्हणाले, “नशिराबाद स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. नागरिकांच्या सुखसोयी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनासोबत समन्वय साधून विकासकामांचा वेग कायम ठेवला जाईल.”

शहरवासीयांनी ज्या विश्वासाने नेतृत्वाची धुरा त्यांच्या हाती सोपवली, त्या विश्वासाला न्याय देत विविध विकासकामांवर भर दिला जात असून वाकी नदी स्वच्छता मोहीम हे त्याचे आणखी एक महत्त्वाचे उदाहरण ठरत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version