Spread the love

मान्यता, नोंदणी, भरती आणि सेवा हक्कांसाठी राज्यभरातील पदविकाधारक एकवटणार; शासनाकडे तातडीने निर्णयाची मागणी

जळगाव | धीरज सैतवाल जैन । प्रतिनिधी

राज्यातील पशुवैद्यकीय पदविकाधारकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, २२ जून २०२६ रोजी पुण्यात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ‘पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवस्थापन सेवा संघ, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने हे आंदोलन औंध येथील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास आयुक्तालयासमोर सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार आहे.

राज्यातील दुर्गम व ग्रामीण भागात पशुधन विकास, कृत्रिम रेतन, दुग्ध व्यवसाय वृद्धी आणि पशुरोग नियंत्रणासाठी पदविकाधारक पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असूनही त्यांच्या विविध मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

प्रमुख मागण्या

  • ‘महाराष्ट्र राज्य दुय्यम पशुवैद्यकीय परिषद विधेयक’ तातडीने शासकीय विधेयक म्हणून मंजूर करावे.
  • बोव्हाईन ब्रीडिंग ॲक्टमध्ये आवश्यक सुधारणा करून संबंधित पदविका अभ्यासक्रमांचा समावेश करावा.
  • कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना आवश्यक साहित्य, योग्य मानधन आणि विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे तसेच दंडात्मक तरतुदींमध्ये आवश्यक बदल करावेत.
  • पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेत निर्माण झालेली पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदे सरळसेवेने तातडीने भरावीत.
  • पशुसंवर्धन, दुग्धव्यवस्थापन व पशुवैद्यकीय पदविका अभ्यासक्रमांना शासनमान्यता देऊन पदविकाधारकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक हक्कांचे संरक्षण करावे.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी “पदविकाधारकांना न्याय – पशुसंवर्धन क्षेत्राला बळ” आणि “नोंदणी, मान्यता व रोजगार हा आमचा अधिकार” अशा घोषणांसह आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या मागण्या केवळ पदविकाधारकांच्या हिताच्या नसून राज्यातील पशुपालक, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणाशी थेट संबंधित असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

या आंदोलनात जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील पदविकाधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. दीपक लोखंडे यांच्यासह डॉ. शंकर झोपे, डॉ. संदीप भालेराव, डॉ. सोपान दुट्टे, डॉ. योगेश सूर्यवंशी, डॉ. विकास नवले, डॉ. दीपक शेवाळे, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. विवेक अडकमोल, डॉ. बाळू राठोड तसेच सल्लागार डॉ. संजय पाटील (धुळे) यांनी केले आहे.

आंदोलनाची माहिती

  • स्थळ: पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास आयुक्तालय, औंध, पुणे
  • तारीख: सोमवार, २२ जून २०२६
  • वेळ: सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत
Share.
Leave A Reply

Exit mobile version