Spread the love

 महापालिका आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; न्याय मिळेपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार

धुळे | सुनील निकम । प्रतिनिधी

जगन्नाथ नगर येथील रहिवासी मंडाबाई रघुनाथ भाले यांना न्याय मिळावा, त्यांच्या घरावरील कथित कारवाईची निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, या मागण्यांसाठी दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धुळे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून ‘गेट बंद’ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडाबाई भाले या गेल्या 70 ते 80 वर्षांपासून जगन्नाथ नगर परिसरात वास्तव्यास असून त्यांच्या घरावर अतिक्रमण नसतानाही स्थानिक पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने तोडफोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय मालमत्तेचे नुकसान, मानसिक छळ, जातीवाचक शिवीगाळ तसेच व्हॉट्सअॅप ग्रुपवर अपमानास्पद मजकूर प्रसारित केल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

या प्रकरणाच्या निषेधार्थ मंडाबाई भाले यांनी 9 जून 2026 पासून आमरण उपोषण सुरू केल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. तसेच पोलिसांनी त्यांना उपचारासाठी जबरदस्तीने जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यांच्या मुलगा ललित भाले यांनीही साखळी उपोषण सुरू ठेवले असल्याचे सांगण्यात आले.

दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी असा आरोप केला आहे की, परिसरातील इतर कथित अतिक्रमणांवर कारवाई न करता निवडक नागरिकांवरच कारवाई करण्यात आली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

संघटनांच्या म्हणण्यानुसार, 15 जूनपासून जेल रोड परिसरात धरणे आंदोलन सुरू असून, न्याय मिळत नसल्याने 19 जून रोजी महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून ‘गेट बंद’ आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच मंडाबाई भाले किंवा आंदोलनकर्त्यांना कोणतीही जीवितहानी झाल्यास त्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांवर धुळे महानगरपालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

Share.
Leave A Reply

Exit mobile version