Spread the love

झिपरू अण्णा महाराजांच्या नावाच्या मंजूर ठरावाच्या अंमलबजावणीची पुन्हा मागणी; अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा

नशिराबाद | प्रतिनिधी

नशिराबाद शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराला परमपूज्य श्री झिपरू अण्णा महाराज यांचे नाव देण्याच्या मंजूर ठरावाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी शुक्रवार (दि. 19 जून 2026) रोजी प्रस्तावित करण्यात आलेले ‘भिक्षा मागो आंदोलन’ तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. आंदोलनाचे आयोजक रोहित बाळू चौधरी यांनी याबाबत नशिराबाद नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना अधिकृत पत्र देऊन आंदोलन स्थगित करण्याची माहिती दिली.

नगर परिषदेत शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराला श्री झिपरू अण्णा महाराज यांचे नाव देण्याचा ठराव यापूर्वीच मंजूर झाला आहे. मात्र, प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याने या विलंबाच्या निषेधार्थ रोहित चौधरी यांनी 19 जून रोजी सकाळी 11 वाजता अनोख्या पद्धतीने ‘भिक्षा मागो आंदोलन’ करण्याचा इशारा दिला होता.

मात्र, काही अपरिहार्य वैयक्तिक कारणे आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे नियोजित दिवशी आंदोलन करणे शक्य नसल्याने ते काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आल्याचे चौधरी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. आंदोलनाची पुढील तारीख लवकरच निश्चित करून प्रशासनाला अधिकृतपणे कळविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मंजूर ठरावाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी

रोहित चौधरी यांनी प्रशासनाकडे मंजूर ठरावाची विलंब न करता अंमलबजावणी करण्याची मागणी केली असून, याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आगामी काळात लोकशाही मार्गाने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

या संदर्भातील पत्राच्या प्रती जळगाव जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनाही माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. तसेच हे पत्र नशिराबाद नगर परिषदेच्या टपाल संकलन केंद्रात अधिकृतपणे स्वीकारण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version