Spread the love

उघडे विद्युत पॅनेल, लोंबकळणाऱ्या तारा आणि जमिनीवर पडलेल्या केबल्समुळे भीतीचे वातावरण; तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

नशिराबाद (प्रतिनिधी): पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना नशिराबाद येथील आठवडे बाजार परिसरात महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बाजारातील मुख्य ठिकाणी असलेली विद्युत वितरण पॅनेल (डीपी) उघड्या आणि मोडकळीस आलेल्या अवस्थेत असून, उघड्या विद्युत तारा आणि असुरक्षित केबल्समुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आठवडे बाजारात दररोज मोठ्या प्रमाणात व्यापारी, ग्राहक, महिला आणि लहान मुलांची वर्दळ असते. अशा गर्दीच्या ठिकाणी असलेली डीपी पूर्णपणे उघडी असल्याने तिच्यामधील फ्यूज, विद्युत जोडण्या आणि उच्चदाबाच्या तारा थेट उघड्यावर दिसून येत आहेत. विशेष म्हणजे परिसरात कचरा आणि पालापाचोळा साचलेला असून, पावसाळ्यात येथे पाणी साचल्यास विजेचा प्रवाह परिसरात पसरण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

याशिवाय डीपीलगतच्या रस्त्यावर विजेच्या जाड केबल्स जमिनीवरच पडलेल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. या मार्गावरून सतत जड वाहनांची आणि नागरिकांची ये-जा सुरू असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.

या गंभीर परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्ते रोहित बाळू चौधरी यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी सांगितले की, अपघात झाल्यानंतर चौकशी करण्यापेक्षा तो होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी महावितरणने सर्व उघड्या डीपी आणि धोकादायक विद्युत तारा तातडीने सुरक्षित कराव्यात, अन्यथा संभाव्य दुर्घटनेची जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनीही या समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्वरित दुरुस्तीची मागणी केली आहे. पावसाळ्यात ओलाव्यामुळे विजेचा धक्का लागण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे उघडी डीपी आणि लोंबकळणाऱ्या तारा नागरिकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी संबंधित वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पुढील २४ तासांत डीपी बॉक्स सुरक्षित करावेत, उघड्या तारांची दुरुस्ती करावी आणि संपूर्ण परिसरातील विद्युत यंत्रणा सुरक्षित करावी, अशी मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास नागरिकांच्या सुरक्षेसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version