आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी सादर केली विविध योगासने व सूर्यनमस्कार
नशिराबाद (धीरज सैतवाल जैन ) : ‘योग हा केवळ व्यायाम नसून ती एक निरोगी आणि संतुलित जीवनशैली आहे,’ हा संदेश देत नशिराबाद येथील ग्लोबस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात आयोजित विशेष योग सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध योगासने आणि सूर्यनमस्कारांचे प्रभावी सादरीकरण केले.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक योगाभ्यासाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळी योग, सूर्यनमस्कार तसेच विविध प्रकारची योगासने अत्यंत शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने सादर केली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर योगमय झाला होता.
कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे मानवी जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक क्षमता वाढते, शरीर सुदृढ राहते, मानसिक एकाग्रता सुधारते आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो, असे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सकारात्मक जीवनशैली घडविण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
यावेळी शिक्षकांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर करून त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आरोग्यविषयक फायदे सोप्या भाषेत स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेत सूर्यनमस्कार आणि विविध आसनांचे प्रात्यक्षिक सादर केले.
याप्रसंगी बोलताना शिक्षकांनी सांगितले की, “योग ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक विचारांसाठी योग हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे.”
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, फिटनेस आणि मानसिक स्वास्थ्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून नियमित योगाभ्यासाची प्रेरणा मिळाली आहे. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे पालक आणि परिसरातील नागरिकांकडूनही कौतुक करण्यात येत आहे.
