प्रगती शिलेदार फाऊंडेशन व एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचा स्तुत्य उपक्रम; शाळेला प्रिंटर आणि रंगकाम साहित्यही प्रदान
पाटण : सातारा जिल्ह्यातील जाधववाडी (चाफळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रविवारी समाजाभिमुख उपक्रमाचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले. प्रगती शिलेदार फाऊंडेशन आणि एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, पुणे येथील कर्मचारी वर्गाच्या वतीने जाधववाडी व जंगलवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दर्जेदार स्कूल बॅग, कंपास बॉक्स, पेन, पेन्सिल, पाण्याच्या बाटल्या, रायटिंग पॅड, वह्या आदी आवश्यक साहित्य इयत्तेनुसार वितरित करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी बिस्किटांचे पुडे आणि केळी देऊन आनंद द्विगुणित करण्यात आला.
केवळ विद्यार्थ्यांपुरताच हा उपक्रम मर्यादित न ठेवता शाळेच्या शैक्षणिक कामकाजासाठी प्रिंटरची भेट देण्यात आली. याशिवाय जंगलवाडी प्राथमिक शाळेसाठी संपूर्ण रंगकाम साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे शाळांच्या शैक्षणिक व भौतिक विकासाला मोठी मदत मिळणार आहे.
या कार्यक्रमावेळी जाधववाडी व जंगलवाडी प्राथमिक शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह हा उपक्रम यशस्वी झाल्याची साक्ष देत होता.
यावेळी मनोगत व्यक्त करताना जाधववाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन सुतार यांनी दात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “केवळ फोनद्वारे झालेला संपर्क आणि त्यातून प्रत्यक्षात साकारलेले हे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. मित्रपरिवाराला एकत्र बांधून ठेवत समाजोपयोगी कामासाठी झटणाऱ्या या सर्वांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता आणि सेवाभावाची ऊर्जा आम्हालाही सतत प्रेरणा देत राहील. या उदात्त कार्यासाठी आम्ही सर्वजण त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत.”
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या शिक्षणाला नवी उभारी मिळणार असून, समाजातील दातृत्व आणि सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेला बळकटी देणारे ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
