Spread the love

चोरट्यांचा धाडसी कारनामा; भिंतीतील पाईपमधून वायर ओढून नेल्याने घरमालकाला मोठा आर्थिक फटका

मन्यारखेडा : गावातील एका नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत इलेक्ट्रिकल वायरिंगसाठी टाकण्यात आलेल्या महागड्या वायर लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत अंदाजे २५ ते ३० हजार रुपये किमतीच्या वायर चोरून नेण्यात आल्याने घरमालकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मन्यारखेडा परिसरात एका निवासी घराचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून सध्या वीज फिटिंगचे काम सुरू होते. घरातील भिंतींमध्ये पाईप टाकून मुख्य डिस्ट्रिब्युशन बोर्ड (डीबी बॉक्स) तसेच विविध जंक्शन बॉक्सपर्यंत वायरिंगचे काम पूर्ण करण्यात आले होते. रात्रीच्या वेळी बांधकामस्थळी कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मुख्य डीबी बॉक्स आणि जंक्शन बॉक्समधील वायर कटरच्या साहाय्याने कापल्या. त्यानंतर भिंतीतील पाईपमधून संपूर्ण वायर ओढून काढत त्या लंपास केल्या. विशेष म्हणजे, चोरांनी केवळ साहित्य चोरी केले नाही तर पूर्ण झालेल्या वायरिंग कामाचेही नुकसान केले आहे.

आज सकाळी घरमालक आणि कामगार कामासाठी घटनास्थळी पोहोचले असता मुख्य इलेक्ट्रिकल बोर्ड आणि जंक्शन बॉक्स रिकामे दिसून आले. तपासणी केल्यानंतर पाईपमधून सर्व वायर चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार पाहून घरमालकाला मोठा धक्का बसला.

या घटनेमुळे परिसरातील बांधकाम व्यावसायिक आणि घरमालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची गरज अधोरेखित होत असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

स्थानिक नागरिकांनीही अशा प्रकारच्या वाढत्या चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे मन्यारखेडा परिसरात खळबळ उडाली असून चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version