गुटख्याने भरलेली कार जप्त, मात्र मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह
विजय निकम | शहादा
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा परिसरात पोलिसांनी रात्रीच्या गस्ती दरम्यान प्रतिबंधित ‘विमल’ गुटख्याचा मोठा साठा जप्त केला. मात्र, कारवाईनंतर या प्रकरणातील मुख्य तस्कर पोलिसांच्या तावडीतून निसटल्याने संपूर्ण प्रकरणावर संशयाचे सावट निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सारंगखेडा परिसरात पोलिसांचे पथक नियमित गस्त घालत असताना एका संशयास्पद कारमध्ये काही वस्तू भरल्या जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित वाहन चालकाने वाहन भरधाव वेगाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू करत काही अंतरावर वाहन अडविले.
वाहन थांबवल्यानंतर चालकाची चौकशी करण्यात आली. मात्र, त्याच्याकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही. संशय बळावल्याने पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित ‘विमल’ गुटखा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी वाहनासह गुटख्याचा साठा जप्त केला.
मात्र, या कारवाईतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गुटखा जप्त होऊनही मुख्य तस्कर अथवा वाहनाशी संबंधित प्रमुख व्यक्ती पोलिसांच्या हाती लागली नाही. त्यामुळे “गुटखा सापडला, पण मुख्य आरोपी पळून कसा गेला?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिकांमध्ये या प्रकरणाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून काहींनी पोलिसांच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले आहे. तर काहींनी या प्रकरणात संगनमताची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून फरार आरोपीचा तातडीने शोध घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, पोलिसांनी संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून फरार संशयिताचा शोध सुरू असल्याचे सांगितले आहे. मात्र, या कारवाईमागील नेमके सत्य काय आहे, आरोपी कोण आहे आणि तो पोलिसांच्या हातातून कसा निसटला, याबाबत अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. या घटनेमुळे सारंगखेडा परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपासातून नेमकी वस्तुस्थिती समोर येते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
