जळगाव कलेक्टोरेटवर धडक आंदोलन; शासन निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
जळगाव : आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरक्षण निश्चिती प्रक्रियेत सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना तिलांजली देण्यात आल्याचा आरोप करत बहुजन मुक्ती पार्टीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन छेडले. महाराष्ट्र शासनाच्या २५ मे व २६ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयाविरोधात पक्षाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांना निवेदन सादर करण्यात आले.
जुलै महिन्यात राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित जागा निश्चित करताना संबंधित समाजाची लोकसंख्या, सामाजिक वास्तव आणि प्रभावी राजकीय प्रतिनिधित्व यांचा विचार करण्यात आलेला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. ज्या वॉर्डांमध्ये संबंधित प्रवर्गाची लोकसंख्याच नाही, त्या ठिकाणी आरक्षण लागू करून लोकशाहीची थट्टा करण्यात आल्याचे बहुजन मुक्ती पार्टीचे म्हणणे आहे.
पक्षाच्या मते, भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३(डी) अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभावी राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. मात्र शासनाच्या नव्या निर्णयामुळे या घटनात्मक उद्देशालाच हरताळ फासण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला.
यावेळी पक्षाच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयातील के. कृष्णमूर्ती विरुद्ध भारत सरकार तसेच विकास कृष्णराव गवळी विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणांचा संदर्भ देत शासन निर्णय घटनात्मक तरतुदींना विरोधी असल्याचा दावा केला. तसेच भारतीय राज्यघटनेतील कलम १४, १५(४), १५(५), १७, ३८, ४६ आणि २४३(डी) यांच्या भावनेचे उल्लंघन होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
बहुजन मुक्ती पार्टीच्या राज्य समीक्षा प्रभारी सुमित्र अहिरे यांनी सांगितले की, शासनाने २५ मे व २६ मे २०२६ चा निर्णय तात्काळ रद्द करून पूर्वीप्रमाणे लोकसंख्येच्या आधारे आरक्षण निश्चित करावे. अन्यथा राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल.
हे आंदोलन बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा युवा अध्यक्ष सुनील देहडे आणि तालुका अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यामध्ये विविध सामाजिक, राजकीय आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य विलास सोनवणे, सावरकर रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे, बांभोरीचे सरपंच सचिन बिर्हाडे, उमाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच योगेश सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष संजय जाधव यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
