Spread the love

ग्राहक आयोगात धाव घेतल्यानंतर विधवा महिलेला मिळाले दोन लाखांचे विमा संरक्षण

भुसावळ | संघरत्न सपकाळे ।

प्रधानमंत्री सामाजिक विमा योजनेअंतर्गत काढलेल्या अपघाती विमा पॉलिसीची रक्कम मिळवण्यासाठी तब्बल संघर्ष करावा लागलेल्या भुसावळ येथील एका कुटुंबाला अखेर न्याय मिळाला आहे. डाक विभागाने पूर्वी नाकारलेला विमा दावा मंजूर करत मृत व्यक्तीच्या पत्नीच्या खात्यात दोन लाख रुपयांची विमा रक्कम जमा केली आहे.

भुसावळ शहरातील रहिवासी वसंत चावदस मोरे यांनी उपडाक विभागामार्फत प्रधानमंत्री सामाजिक विमा योजनेअंतर्गत बचत खात्यावर दोन लाख रुपयांच्या अपघाती विमा संरक्षणाची पॉलिसी घेतली होती. मात्र, ११ मे २०२४ रोजी गडकरी नगर परिसरात पाण्याच्या टाकीचे बांधकाम करत असताना ते खाली पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दावा फेटाळल्यानंतर ग्राहक आयोगात धाव

पतीच्या निधनानंतर पत्नी सुलभा वसंत मोरे यांनी आवश्यक कागदपत्रांसह विमा रकमेसाठी डाक विभागाकडे दावा दाखल केला. मात्र, व्हिसेरा अहवाल (Viscera Report) सादर न केल्याचे कारण देत मुख्य डाक अधिकारी, नवी दिल्ली यांनी दावा नामंजूर केला.

यानंतर सुलभा मोरे यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, जळगाव येथे तक्रार दाखल केली. प्रकरण ग्राहक आयोगासमोर गेल्यानंतर डाक विभागाने फेरविचार करत स्वतः पोलीस प्रशासनाशी पत्रव्यवहार करून आवश्यक व्हिसेरा अहवाल प्राप्त केला.

अखेर खात्यात जमा झाले दोन लाख रुपये

आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाने सुलभा मोरे यांच्या खात्यात दोन लाख रुपयांची विमा रक्कम जमा केली. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रकरणाला अखेर सकारात्मक पूर्णविराम मिळाला. या प्रकरणात सुलभा मोरे यांच्या वतीने ॲड. राजेश एस. उपाध्याय आणि ॲड. वैशाली सोनवणे यांनी कामकाज पाहिले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version