Spread the love

 हिंदवी स्वराज्य दिनानिमित्त २३ ते २७ जूनदरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम; २७ जूनला भव्य शिवराज्याभिषेक मिरवणूक

जामखेड | प्रतिनिधी (बापुसाहेब घोडेस्वार)

श्री शिव राज्याभिषेक उत्सव समिती, जामखेड तालुक्याच्या वतीने हिंदवी स्वराज्य दिनानिमित्त यंदाही भव्य श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवशके ३५३ प्रारंभानिमित्त मंगळवार दि. २३ जून ते शनिवार दि. २७ जून २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

सोहळ्याची सुरुवात मंगळवार दि. २३ जून रोजी रात्री ७ ते ९ या वेळेत विनोद सम्राट ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे (नेवासा) यांच्या कीर्तनाने झाली. बुधवार दि. २४ जून रोजी भागवताचार्य ह.भ.प. समाधान महाराज शर्मा (केज) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

गुरुवार दि. २५ जून रोजी रात्री ७ ते ९ या वेळेत शिवशाहीर पृथ्वीराज माळी (सांगली) यांचा शिवचरित्रावर आधारित विशेष कार्यक्रम होणार असून, शिवप्रेमींसाठी तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

शुक्रवार दि. २६ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर रात्री कीर्तन चंद्रिका ह.भ.प. रोहिणीताई महाराज परांजपे-माने (पुणे) यांचे कीर्तन संपन्न होणार आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, तहसील कार्यालयासमोर सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, जास्तीत जास्त शिवभक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीने केले आहे.

विशेष आकर्षण : शिवराज्याभिषेक आणि भव्य मिरवणूक

शनिवार दि. २७ जून रोजी पहाटे ५ वाजता सप्तनद्या, गडकोट, किल्ले आणि तीर्थक्षेत्रांमधून आणलेल्या पवित्र जलाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी जामखेड शहरातून भव्य शिवराज्याभिषेक मिरवणूक काढण्यात येणार असून, हजारो शिवप्रेमी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version