ओढा रेल्वे स्थानकाजवळील घटना; मालगाडीच्या डब्यात कपड्यात गुंडाळून सोडून दिलेली बालिका सुरक्षित
संघरत्न सपकाळे । भुसावळ। प्रतिनिधी
रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानांच्या सतर्कतेमुळे मालगाडीच्या डब्यात आढळलेल्या एका नवजात बालिकेचे प्राण वाचल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. नाशिक पोस्टचे आरपीएफ कॉन्स्टेबल योगेश गावड आणि एमएसएफ कर्मचारी प्रशांत जगताप यांच्या तत्परतेमुळे या चिमुकलीला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ जून रोजी रात्री नियमित गस्तीदरम्यान ओढा रेल्वे स्थानक परिसरात उभी असलेल्या मालगाडीची तपासणी सुरू होती. पहाटे सुमारे २.४५ वाजता मालगाडीच्या एका डब्यातून बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याचे जवानांच्या निदर्शनास आले.
आवाजाच्या दिशेने जाऊन पाहणी केली असता मालगाडीच्या १३ व्या डब्यात कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत एक नवजात बालिका आढळून आली. ही धक्कादायक बाब लक्षात येताच जवानांनी कोणताही वेळ न दवडता वरिष्ठ रेल्वे अधिकारी, जीआरपी पोलीस आणि चाईल्डलाईन प्रतिनिधींना माहिती दिली.
त्यानंतर बालिकेची सुरक्षितता सुनिश्चित करत तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली. नवजात बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या घटनेनंतर बालिकेला मालगाडीच्या डब्यात कोणी आणि कोणत्या परिस्थितीत सोडून दिले, याबाबत रेल्वे पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. आरपीएफ जवानांनी दाखविलेल्या तत्परता, संवेदनशीलता आणि कर्तव्यदक्षतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून त्यांच्या सतर्कतेमुळे एका निष्पाप जीवाला नवजीवन मिळाले आहे.
