धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन; जुनी पेन्शन, अनुशेष भरती व कंत्राटी भरती रद्द करण्याचीही मागणी
धुळे | सुनील निकम। प्रतिनिधी
राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षण तात्काळ लागू करावे, जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने सुरू करावी तसेच कंत्राटी भरती धोरण रद्द करावे, या प्रमुख मागण्यांसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा धुळे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या ७ मे २०२१ च्या निर्णयामुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले असून अनेक कर्मचारी न्याय्य हक्कांपासून वंचित राहिल्याचा आरोप महासंघाने निवेदनात केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा तसेच केंद्र शासनाच्या १५ जून २०१८ च्या परिपत्रकाचा दाखला देत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवरील अडथळे दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महासंघाने कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही पदोन्नतीतील आरक्षणाची अंमलबजावणी करावी, २९ डिसेंबर २०१७ व ७ मे २०२१ चे वादग्रस्त आदेश रद्द करावेत, सरळसेवा भरतीतील मागासवर्गीय अनुशेष तत्काळ भरावा आणि कंत्राटी नोकरभरती धोरण मागे घ्यावे, अशा मागण्या केल्या आहेत.
याशिवाय वाहन चालक, परिचर व इतर पदांची भरती कंत्राटी पद्धतीऐवजी सरळसेवा भरतीद्वारे करावी, दिव्यांग विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा, मानधनावरील कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावे तसेच राज्यातील विविध विभागांतील पदकपात थांबवून वाढत्या लोकसंख्येनुसार नवीन पदनिर्मिती करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासनाने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेऊन सामाजिक न्यायाची भूमिका अधोरेखित करावी, असे महासंघाने नमूद केले आहे. या मागण्यांबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश बोरसे, कार्याध्यक्ष संजय लोंढे, सचिव लक्ष्मीकांत चव्हाण, कोषाध्यक्ष प्रकाश पवार, महिला संघटक बबिता पटले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
