Spread the love

वसतिगृहातील २२ विद्यार्थिनींना विष देण्याचा कथित कट; कंत्राटी महिला शिपायाविरुद्ध गुन्हा

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार येथील होळ तर्फ हवेली शिवारातील सामाजिक न्याय विभागाच्या महिला वसतिगृहात २२ विद्यार्थिनींना विषप्रयोग करून ठार मारण्याचा कथित कट उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका कंत्राटी महिला शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित महिलेला सेवेतूनही मुक्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैयक्तिक वादातून संबंधित कंत्राटी महिला शिपायाने वसतिगृहातील स्वयंपाक करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला हाताशी धरून विद्यार्थिनींच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विष टाकण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. मात्र, स्वयंपाकी महिलेने हा प्रकार विद्यार्थिनींच्या निदर्शनास आणून दिल्याने संभाव्य अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली असून त्यामध्ये विद्यार्थिनींच्या पिण्याच्या पाण्यात विष मिसळण्याबाबत चर्चा ऐकू येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या ऑडिओमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

विद्यार्थिनींचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

या घटनेमुळे घाबरलेल्या नर्सिंग तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या २२ विद्यार्थिनींनी मंगळवारी सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली. वंचित बहुजन आघाडीचे तळोदा तालुकाध्यक्ष विशाल सामुद्रे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थिनींनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

प्रशासनाची तातडीने दखल

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. मित्तली सेठी यांनी संबंधित कंत्राटी महिला शिपायाविरोधात तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी संबंधित महिला कर्मचाऱ्याला सेवेतून मुक्त केल्याची माहिती दिली.

विधिमंडळातही प्रकरणाचे पडसाद

या घटनेचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. चित्रा वाघ यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित करून विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला. त्यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले. या प्रकरणामुळे वसतिगृहांतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, संपूर्ण घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी होत आहे

Share.
Leave A Reply

Exit mobile version