535 एकल महिलांच्या सन्मानाचा निर्णय; आत्मविश्वास, सन्मान आणि सामाजिक आधारासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार
जगदीश सपकाळे जळगाव तालुका (प्रतिनिधी) : एकल महिलांना सन्मान, आत्मविश्वास आणि सामाजिक आधार मिळावा या उद्देशाने कानळदा ग्रामपंचायतीतर्फे आयोजित एकल महिला मेळावा व कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 23 जून एकल महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात गावातील 535 एकल महिलांचा सन्मान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला.
कार्यक्रमास जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविकात सरपंच तथा निवृत्त डीवायएसपी पुंडलिक सपकाळे यांनी ग्रामपंचायतीने एकल महिलांच्या सन्मानासाठी विशेष ठराव मंजूर केल्याची माहिती दिली. गावातील कोणत्याही एकल महिलेला अपमानास्पद वागणूक दिली जाणार नाही आणि प्रत्येक शुभकार्यात त्यांना सन्मानाचे स्थान दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 30 महिलांना खासदार स्मिताताई वाघ आणि करिष्मा नायर यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. सन्मान स्वीकारताना अनेक महिलांच्या भावना अनावर झाल्या आणि सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले.
मार्गदर्शन करताना खासदार स्मिताताई वाघ यांनी स्वतःच्या आयुष्यातील संघर्षमय अनुभव सांगत महिलांना आत्मविश्वासाने जीवन जगण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रेरणादायी मनोगतामुळे उपस्थित महिलांच्या भावना दाटून आल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे तसेच मालमत्ता आणि शेतीच्या नोंदींमध्ये स्वतःचे नाव समाविष्ट करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात पंचायत समिती व विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच ग्रामपंचायत स्तरावर एकल महिलांची स्वतंत्र समिती स्थापन करून त्यांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी दरमहा बैठक घेण्यात येणार असल्याची घोषणा सरपंच पुंडलिक सपकाळे यांनी केली. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचत गट सदस्य तसेच गावातील मोठ्या संख्येने एकल महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या. महर्षी कण्वाश्रम सभागृहात झालेला हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श ठरत असून जिल्हाभरातून त्याचे कौतुक होत आहे.
