वीज खांबावरील दुरुस्तीच्या कामादरम्यान भीषण अपघात; 23 वर्षीय रोहित ढाकरे यांना कायमस्वरूपी अपंगत्व, पत्नी व चिमुकल्याच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह
वीजप्रवाह सुरू झाल्याने कामगार खाली कोसळला • गंभीर दुखापतीमुळे अपंगत्व • संबंधित तंत्रज्ञाविरुद्ध गुन्हा दाखल • न्याय व नुकसानभरपाईची मागणी
पहूर । गणेश वानखेडे। ता. जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील पहूर परिसरात घडलेल्या एका भीषण अपघाताने 23 वर्षीय तरुणाचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. घरातील एकमेव कमावता सदस्य असलेल्या रोहित हरीष ढाकरे यांना वीज खांबावरील दुरुस्तीचे काम करत असताना अचानक सुरू झालेल्या वीजप्रवाहाचा जोरदार धक्का बसला. या अपघातात ते खांबावरून खाली कोसळले असून गंभीर दुखापतीमुळे त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित ढाकरे हे महावितरणच्या बाह्य स्त्रोतावरील कामगार म्हणून कार्यरत होते. 10 फेब्रुवारी 2026 रोजी पहूर परिसरातील 11 केव्ही वीजवाहिनीवरील दुरुस्तीचे काम सुरू होते. काम सुरू करण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर रोहित हे वीज खांबावर चढून काम करत असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाला. या धक्क्यामुळे त्यांचा तोल गेला आणि ते थेट खाली कोसळले. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी पहूर, जळगाव आणि पुढे मुंबई येथे हलविण्यात आले. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतर त्यांचा जीव वाचला असला तरी या अपघातामुळे त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्याचा दावा करण्यात येत आहे. परिणामी त्यांच्या कुटुंबावर आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले आहे. रोहित यांच्या कुटुंबात पत्नी आणि अवघा एक वर्षाचा मुलगा आहे. घरातील सर्व आर्थिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. मात्र या अपघातानंतर त्यांची काम करण्याची क्षमता बाधित झाली असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. उपचारासाठी झालेला मोठा खर्च, भविष्यातील वैद्यकीय गरजा आणि लहान मुलाच्या संगोपनाची चिंता यामुळे संपूर्ण कुटुंब प्रचंड तणावाखाली आहे.
या प्रकरणी संबंधित वरिष्ठ तंत्रज्ञ गोविंद सुखलाल धनगर यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 125 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काम सुरू असताना वीजपुरवठा कसा सुरू झाला, यामागे निष्काळजीपणा होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.
न्याय आणि नुकसानभरपाईची मागणी
दरम्यान, रोहित ढाकरे यांनी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या अपघातामुळे झालेले शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान लक्षात घेऊन योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या घटनेमुळे केवळ रोहित यांचेच नव्हे तर त्यांच्या पत्नी आणि चिमुकल्या मुलाचे भवितव्यही अंधारात गेले आहे. त्यामुळे या कुटुंबाला न्याय आणि आर्थिक आधार मिळणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून रोहित ढाकरे यांना न्याय मिळावा, अशी सर्वसामान्य नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
