पहिल्याच पावसात शाळेचे मैदान जलमय; डेंग्यू, मलेरिया आदी आजारांचा धोका, पालकांचा प्रशासनावर संताप
शाळेच्या पटांगणात साचले पाणी • विद्यार्थ्यांना पाण्यातूनच जावे लागते वर्गात • डासांची वाढती पैदास • प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप • तातडीने उपाययोजनांची मागणी
नशिराबाद (प्रतिनिधी) : पावसाळा सुरू होताच पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेचे चित्र अनेक ठिकाणी समोर येत आहे. त्यातच नशिराबाद येथील द्वारका नगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेची अत्यंत चिंताजनक अवस्था उघड झाली आहे. पहिल्याच काही पावसांत शाळेच्या संपूर्ण पटांगणाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह त्यांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शाळेच्या परिसरातील मैदानात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याने संपूर्ण परिसर चिखलमय झाला आहे. शाळेचे मुख्य प्रवेशद्वार, पिण्याच्या पाण्याचा हातपंप तसेच विद्यार्थ्यांच्या खेळासाठी असलेली घसरगुंडी यांसारखी साधनेही पाण्याखाली गेली आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत वर्गात जावे लागत आहे.
लहान मुलांना दररोज या पाण्यातून ये-जा करावी लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. मुले घसरून पडण्याच्या घटना घडू शकतात, अशी भीती पालकांनी व्यक्त केली आहे. शाळेत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे मैदानात साचलेल्या पाण्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढला असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर संकट ओढवू शकते. शासन एकीकडे स्वच्छता आणि आरोग्यविषयक विविध मोहिमा राबवत असताना जिल्हा परिषद शाळेतील ही परिस्थिती प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शाळेच्या परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याने दरवर्षी ही समस्या उद्भवते. मात्र याकडे संबंधित विभागाकडून कायम दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
“आमची मुले शाळेत शिकण्यासाठी येतात की आजारी पडण्यासाठी?” असा संतप्त सवाल आता पालकांकडून उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
द्वारका नगर येथील नागरिक आणि पालकांनी शिक्षण विभाग, गटविकास अधिकारी तसेच स्थानिक प्रशासनाने त्वरित दखल घेऊन शाळेच्या मैदानातील पाण्याचा निचरा करावा, मैदानाची दुरुस्ती करावी आणि जंतुनाशक फवारणी करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
