अतिरिक्त ग्रामसेवकाला सह्यांचे अधिकार नसल्याने प्रशासकीय कामकाज ठप्प; प्रशासकाने स्वतःच्या खिशातून खर्च केल्याचा दावा, ग्रामस्थ संतप्त
रतन अडकमोल । एरंडोल ग्रामीण प्रतिनिधी :
एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव ग्रामपंचायतीत गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासनाचा कारभार अक्षरशः ठप्प झाला आहे. नियमित ग्रामसेवक आजारी रजेवर असल्याने त्यांच्या जागी अतिरिक्त महिला ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आली असली, तरी त्यांना आर्थिक व्यवहार व सह्यांचे अधिकार नसल्याने ग्रामपंचायतीची अनेक महत्त्वाची कामे रखडली आहेत. परिणामी गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता आणि विकासकामांवर मोठा परिणाम झाला असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गावातील पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये अनेक ठिकाणी गळती झाली आहे. मात्र संबंधित दुरुस्तीची कामे मंजुरीअभावी रखडली असून, या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. पावसाळ्यातही नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.
दरम्यान, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यामुळे येथे प्रशासक म्हणून भानुदास मते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ग्रामसेवकांकडे आर्थिक अधिकार नसल्याने आवश्यक निधी काढणे शक्य होत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे गावातील अनेक अत्यावश्यक कामे स्वतःच्या खिशातून खर्च करून करावी लागत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आतापर्यंत जवळपास ८० हजार रुपये स्वतः खर्च करून विविध कामे मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले.
पावसाळा सुरू झाल्यानंतर गावातील स्वच्छतेची समस्याही गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असून महिला स्वच्छतागृहांभोवती मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. अस्वच्छ वातावरणामुळे डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या आजारांचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वेळेत स्वच्छता मोहीम आणि जंतुनाशक फवारणी न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
ग्रामपंचायतीतील प्रशासकीय अडचणींमुळे विकासकामांना पूर्णपणे ब्रेक लागला असून, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करून सक्षम ग्रामसेवकाची नियुक्ती करावी, तसेच अतिरिक्त ग्रामसेवकाला आवश्यक अधिकार देऊन प्रलंबित कामे मार्गी लावावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
या संदर्भात एरंडोल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रतिभा सुर्वे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.
“गेल्या दीड महिन्यांपासून अतिरिक्त ग्रामसेवकाची नियुक्ती असली तरी आर्थिक अधिकार नसल्याने कोणतीही कामे होत नाहीत. त्यामुळे गावातील अनेक आवश्यक कामे मला स्वतःच्या खर्चातून करावी लागत आहेत. आतापर्यंत सुमारे ८० हजार रुपये खर्च केले असून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही.”
— भानुदास मते, प्रशासक, रिंगणगाव ग्रामपंचायत
