चोरवड रस्त्यावरील घटना; उच्चभ्रू वस्तीत चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
संदीप पाटील । पारोळा | प्रतिनिधी
पारोळा शहरातील चोरवड रस्त्यावरील पलक बिअर शॉपीवर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी करत तब्बल ४२ पेट्या बिअर आणि गल्ल्यातील सुमारे ६ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. चोरीनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआरही सोबत नेल्याने या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पलक बिअर शॉपीचे मालक योगेश पाटील यांनी मंगळवारी रात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. बुधवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे लोखंडी शटर वाकवलेले दिसून आले. आत जाऊन पाहणी केली असता दुकानातील मोठ्या प्रमाणावर माल चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरट्यांनी शटर वाकवून दुकानात प्रवेश करत किंगफिशर, कॅननसह विविध नामांकित कंपन्यांच्या सुमारे ४२ पेट्या बिअर चोरून नेल्या. तसेच गल्ल्यातील अंदाजे ६ हजार रुपयांची रोकडही लंपास केली. चोरीची ही घटना अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे.
विशेष म्हणजे, चोरीचा कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी चोरट्यांनी दुकानात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआरही उचलून नेला. त्यामुळे तपासात अडचणी निर्माण होण्याची शक्यता असून, पोलिस आता परिसरातील इतर आस्थापनांमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढत आहेत.
ही चोरी चोरवड रस्त्यावरील न्यू बालाजी नगर, छोरिया सिटी यांसारख्या उच्चभ्रू वस्तीच्या परिसरात घडली आहे. घटनास्थळाजवळ पेट्रोल पंप तसेच नेहमी वर्दळ असणारा रस्ता असल्याने अशा ठिकाणी चोरट्यांनी इतक्या धाडसाने चोरी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, रात्रीच्या गस्तीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून प्राथमिक तपास सुरू केला असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
दरम्यान, शहरात वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, रात्रीच्या वेळी अधिक प्रभावी पोलीस गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून केली जात आहे. चोरीचा तपास वेगाने करून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
