Spread the love

धरणगाव पोलीस ठाण्यात मुस्लिम समाजाचे निवेदन; सामाजिक सलोखा व कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्याचे प्रशासनाला आवाहन

धरणगाव | ग्रामीण प्रतिनिधी – वाल्मिक पाटील

दिल्ली येथील नाजिया इलाही खान यांनी सोशल मीडियावर केल्याचा आरोप असलेल्या कथित वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत धरणगाव शहरातील मुस्लिम समाज व सर्व पंच कमेटीच्या वतीने धरणगाव पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कथितरित्या आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याने मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून समाजात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही धर्मातील श्रद्धास्थान, पूजनीय व्यक्ती किंवा धार्मिक भावना यांचा अवमान होणे हे सामाजिक सलोखा, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेस बाधक ठरू शकते, असेही निवेदनात म्हटले आहे.

भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली.

यावेळी मुस्लिम समाजाचे पंच नगर मोमीन यांनी प्रशासनाला आवाहन करत शहरातील शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन तातडीने आवश्यक ती पावले उचलावीत, असे सांगितले.

सदर निवेदन धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

निवेदन सादर करताना नगरसेवक हाजी इब्राहिम, माजी नगरसेवक अहमद पठाण, करीम सय्यद, नगर मोमीन, रियाज बागवान, करीम खान, नदीम काझी, समद मणियार, रहेमान शाह, याकुब खान, हमीद पठाण, सज्जाद अली, शेख रहीम, साजिद कुरेशी, मो. मोईन, अजहरभाई, फखरोद्दीन मोमीन, दस्तगीर मणियार, साजिद शेख, सरफराज मोमीन, कलीम मोमीन यांच्यासह मुस्लिम समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, मशिदींचे ट्रस्टी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version