Spread the love

शटर वाकवून दुकानात प्रवेश; पुरावे नष्ट करण्यासाठी सीसीटीव्हीचा डीव्हीआरही नेला, पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू

संदीप पाटील । पारोळा तालुका  | प्रतिनिधी :
पारोळा शहरातील चोरवड रस्त्यावरील पलक बिअर शॉपीवर अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल ४२ पेट्या बिअर आणि गल्ल्यातील रोकड लंपास केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. चोरीनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआरही सोबत नेल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शॉपीचे मालक योगेश पाटील यांनी मंगळवारी रात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद केले होते. बुधवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर शटर वाकवून चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून किंगफिशर, कॅननसह विविध नामांकित कंपन्यांच्या सुमारे ४२ पेट्या बिअर तसेच गल्ल्यातील सुमारे ६ हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

विशेष म्हणजे, चोरीचा कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआरही सोबत नेल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांसमोर चोरट्यांचा माग काढण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

ही घटना न्यू बालाजी नगर, छोरिया सिटीसारख्या उच्चभ्रू वस्तीच्या परिसरात घडली आहे. तसेच घटनास्थळाजवळ पेट्रोल पंप असल्याने हा परिसर नेहमीच वर्दळीचा असतो. अशा ठिकाणी चोरट्यांनी निर्भयपणे चोरी केल्याने नागरिकांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version