धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन; कथित आक्षेपार्ह वक्तव्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाईची मागणी
धुळे | प्रतिनिधी
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्या वतीने हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कथितरीत्या आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करत नाजिया इलाही खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, नाजिया इलाही खान यांनी विविध माध्यमांवर तसेच एका मुलाखतीदरम्यान हजरत मोहम्मद पैगंबर, हजरत आयशा तसेच मजार, मशिदी आणि मदरसे यांच्याबाबत कथितरीत्या आक्षेपार्ह व धार्मिक भावना दुखावणारी विधाने केली आहेत. या कथित वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून समाजामध्ये तीव्र नाराजी आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
संबंधित व्हिडिओ, सोशल मीडिया पोस्ट तसेच उपलब्ध इतर पुराव्यांची सखोल चौकशी करण्यात यावी आणि चौकशीत संबंधित आरोप सिद्ध झाल्यास नाजिया इलाही खान यांच्याविरोधात तात्काळ प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी नगरसेवक लल्लू सेठ, जावेद बिल्डर, शब्बीर पिंजारी, साजिद अली साई, वसीम मंत्री, सऊद सरदार, शोएब बेग मिर्झा, आमिर पठाण, पप्पू भैया मसालेवाले, शोएब पाल्टा, जाविद अ. लतिफ, मोईन शेख, जैद झाकीर, फैसल अन्सारी, सऊद आलम, शाबान अन्सारी, शोएब अन्सारी, मुज्जू शेख, आसिफ किराणा यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
