Spread the love

चांदसर दिंडीचा उत्साहात प्रस्थान सोहळा; ३५ वर्षांची अखंड वारी, १७ वर्षांपासून सोहळ्यात नियमित उपस्थिती, विठ्ठल नामाच्या गजरात भक्तिमय वातावरण

पाळधी / चांदसर / जळगाव | प्रतिनिधी

धरणगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र चांदसर येथून पारंपरिक विठ्ठल-रुक्मिणी पालखी-दिंडीचे शुक्रवारी भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. टाळ-मृदंगाचा निनाद, अभंगांचा गजर आणि “ज्ञानोबा-तुकोबा”, “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल” या अखंड नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या सोहळ्यात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “वारी ही माझ्यासाठी केवळ धार्मिक परंपरा नसून आयुष्याचा श्वास आहे. गेल्या १७ वर्षांपासून मी या दिंडी प्रस्थान सोहळ्याला नियमित उपस्थित राहत आहे. दरवर्षी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होताना जनसेवा करण्याची नवी ऊर्जा, नवे बळ आणि प्रेरणा मिळते. विठू माऊलीच्या कृपेनेच जनतेची सेवा करण्याची ताकद मिळाली आहे.”

त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील आठवणींनाही उजाळा दिला. स्वर्गीय मुरलीधर अण्णा पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात “हा मुलगा एक दिवस आमदार होईल,” असे केलेले भाकीत १९९९ मध्ये खरे ठरल्याचे सांगत त्यांनी चांदसर गाव आणि पवार परिवाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “आजपर्यंत मिळालेले प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हेच माझे खरे वैभव असून हे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही,” असे ते भावूक होऊन म्हणाले.

गेली जवळपास ३५ वर्षे एकही वारी जाणीवपूर्वक चुकवलेली नाही, असे सांगताना त्यांनी वारीत मिळणाऱ्या अध्यात्मिक समाधानाचे महत्त्व अधोरेखित केले. “विठ्ठलाच्या नामस्मरणातून मनाला शांतता मिळते, तर वारकऱ्यांच्या सहवासातून समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते. समाजसेवा आणि विठ्ठलसेवा यापेक्षा मोठे भाग्य दुसरे नाही,” असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी सलग बारा वर्षे वारीचा अनुभव कथन करत वारकरी संप्रदायातील शिस्त, समता, सेवाभाव आणि अध्यात्मिक संस्कारांचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना चांदसर वारीचे संस्थापक सुनील पवार यांनी या पारंपरिक दिंडीचा इतिहास उलगडला. चांदसर ते पंढरपूर असा तब्बल २४ दिवसांचा पायी प्रवास करून दिंडी पंढरपूर येथे पोहोचते. तेथे सहा दिवस मुक्काम करून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, नामस्मरण, भजन-कीर्तन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला जातो, अशी माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचा समारोप “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम…” या अखंड नामगजरात आणि विठ्ठलाच्या जयघोषात झाला. यावेळी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

सोहळ्यास खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, उपमहापौर मनोज चौधरी, भाजपचे ज्येष्ठ नेते डी. जे. भाऊसाहेब, सुभाष अण्णा पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, नगरसेवक दीपक सूर्यवंशी, अमित पाटील, अरविंद देशमुख, नितीन सबके, अमर जैन, रोहित निकम, जितेंद्र देशमुख यांच्यासह वारकरी, भजनी मंडळे आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version