Spread the love

ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ हेन्री कझन्स यांच्या छायाचित्रांमधून उलगडला पाटणादेवीचा ऐतिहासिक वारसा; १८९२ मधील नोंदी ठरत आहेत अमूल्य दस्तऐवज

भुसावळ (चाळीसगाव) | प्रतिनिधी – संघरत्न सपकाळे

आज आपण पाहत असलेली पाटणादेवी परिसराची सुमारे १३५ वर्षांपूर्वीची दुर्मिळ छायाचित्रे ही केवळ जुन्या काळाची आठवण नसून आपल्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची जिवंत साक्ष आहेत. ही ऐतिहासिक छायाचित्रे ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ हेन्री कझन्स (Henry Cousens) यांनी सन १८९२ मध्ये काढली होती.

भारतातील पुरातत्त्व विभागात जवळपास ३५ वर्षे कार्यरत असलेल्या हेन्री कझन्स यांनी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि मध्य भारतातील असंख्य प्राचीन मंदिरे, लेणी, शिलालेख आणि ऐतिहासिक वास्तूंचे सखोल सर्वेक्षण केले. त्याच अभ्यास दौऱ्यादरम्यान त्यांनी चाळीसगाव परिसरातील पाटण, पाटणादेवी, वाघळी, नागरदेवळा, संगमेश्वर, चांगदेव आणि इतर अनेक ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन त्यांची छायाचित्रे, रेखाचित्रे आणि सविस्तर नोंदी तयार केल्या.

हेन्री कझन्स यांनी आपल्या अहवालात पाटण परिसराचे वर्णन करताना लिहिले आहे की, हे एक प्राचीन पण उजाड झालेले नगर आहे. संपूर्ण दरी दाट जंगलाने व्यापलेली असून येथे अनेक भग्न मंदिरांचे अवशेष विखुरलेले आहेत. घुबड, कोल्हे, रानडुक्कर, बिबटे आणि अधूनमधून वाघ यांच्याशिवाय येथे फारशी वस्ती नव्हती.”

या नोंदींवरून आज हजारो भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या पाटणादेवी परिसराचे एकेकाळचे जंगलमय आणि निर्जन स्वरूप स्पष्ट होते. तसेच १९व्या शतकातच या परिसराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित होऊ लागल्याचेही या दस्तऐवजांतून दिसून येते.

इतिहासाचा अभ्यास करताना आपण राजे, संत, समाजसुधारक आणि युद्धांचा उल्लेख करतो; मात्र आपल्या वारशाचे छायाचित्रे, नकाशे आणि नोंदींच्या माध्यमातून जतन करणाऱ्या संशोधकांचे योगदान अनेकदा दुर्लक्षित राहते. हेन्री कझन्स हे अशाच महत्त्वाच्या पुरातत्त्वज्ञांपैकी एक असून त्यांनी जतन केलेली छायाचित्रे आज संशोधकांसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी अमूल्य ठेवा ठरली आहेत. आज उपलब्ध असलेली ही दुर्मिळ छायाचित्रे केवळ भूतकाळाची झलक नसून भावी पिढ्यांसाठी आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याची प्रेरणाही देतात. इतिहास जपणे हीच आपल्या भविष्याची मजबूत पायाभरणी असल्याचा संदेश या ऐतिहासिक नोंदींतून अधोरेखित होतो.

Share.
Leave A Reply

Exit mobile version