Spread the love

पत्रकारांना धमकीप्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी; माणगाव पोलीस ठाण्यात निवेदन सादर

बोरघर / माणगाव | विश्वास गायकवाड

ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना उद्देशून केलेल्या कथित आक्षेपार्ह आणि धमकीवजा वक्तव्याचा माणगाव तालुका प्रेस क्लबतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत माणगाव पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देण्यात आले.

माहितीनुसार, उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांशी बोलताना खासदार संजय दिना पाटील यांनी कथितरीत्या धमकीची भाषा वापरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या घटनेनंतर राज्यभरातील विविध पत्रकार संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर माणगाव तालुका प्रेस क्लबचे मुख्य संघटक पद्माकर उभारे, कार्याध्यक्ष गौतम जाधव, सल्लागार उत्तम तांबे, सल्लागार विनोद सापळे, अध्यक्ष संतोष सुतार, उपाध्यक्ष विश्वास गायकवाड आणि सुनील राजभर यांनी माणगाव पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन सादर केले. पत्रकारांशी अशा प्रकारे वागणे निषेधार्ह असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषद यांनीही या घटनेचा निषेध नोंदविला आहे. परिषदेचे एस. एम. देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संबंधित प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली असून खासदारांना देण्यात आलेल्या ‘वाय’ दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेचा फेरविचार करण्याचीही मागणी केली आहे.

पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा आणि जनतेपर्यंत माहिती पोहोचविण्याचा घटनात्मक अधिकार आहे. पत्रकारांना धमकावण्याचे प्रकार लोकशाहीच्या मूल्यांना बाधा आणणारे असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version