Spread the love

विकासकामांवर विश्वास व्यक्त करत विकास महाजन व नरेंद्र सूर्यवंशी यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश

भडगाव | प्रतिनिधी

भडगाव मतदारसंघात झालेल्या विकासकामांमुळे आणि कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या जनहिताभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजप युवा मोर्चाचे उपजिल्हाध्यक्ष विकास महाजन तसेच नरेंद्र सूर्यवंशी यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.

आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन्ही कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघातील विकासकामे, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत आमदार किशोरआप्पा पाटील यांनी घेतलेली भूमिका आणि जनतेशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क यामुळे प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा, विविध विकास प्रकल्प तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे तरुणांमध्ये आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास निर्माण झाला असून विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याची भावना नव्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

या पक्षप्रवेश कार्यक्रमास गटनेते लखीचंद पाटील, नगरसेवक जितेंद्र आचारी, सुधाकर पाटील, महेंद्र ततार, रविंद्र पाटील, नितीन महाजन, सचिन पाटील, कुणाल पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पक्षप्रवेशामुळे भडगाव शहर व परिसरातील शिवसेना संघटनेला अधिक बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, आगामी काळात आणखी काही कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी “विकासाच्या विचाराला साथ, किशोरआप्पांच्या नेतृत्वावर विश्वास” या घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि नव्या कार्यकर्त्यांचे शिवसेना परिवारात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version