जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांचे आवाहन; पोलिओमुक्त समाजासाठी नागरिकांच्या सक्रिय सहभागावर भर
धुळे । सुनील निकम | प्रतिनिधी
धुळे येथील जिल्हा व महिला रुग्णालयात रविवारी (दि. २८ जून) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते धन्वंतरी प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, उपसंचालक (मुंबई शहर) डॉ. प्रसाद भंडारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अश्विनी भामरे, डॉ. स्वप्नील पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक जाधव, डॉ. समीर शेख, डॉ. गीतांजली सोनवणे, प्रशासकीय अधिकारी राकेश भावसार, कार्यालय अधीक्षक खंडू ईशी, बाह्यरुग्ण विभाग परिसेविका प्रतिभा घोडके, अनुपमा लोंढे, मीना गढरे, परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य भूषण जोशी, कमलेश परदेशी, अमरजीत पवार, वैभव भोसले तसेच आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि परिचारिका प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी जिल्ह्यातील पालकांना आवाहन करताना सांगितले की, पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजणे अत्यंत आवश्यक आहे. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी पालकांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला सहकार्य करावे.
आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हाभरातील विविध लसीकरण केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात येत असून, पोलिओमुक्त समाज घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
