Spread the love

साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी; विशेष न्यायालयाचा १३७ पानी निकाल, ‘हा दुर्मीळातील दुर्मीळ गुन्हा’ म्हणत सुनावला मृत्युदंड

पुणे : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आलेले सर्व सातही गुन्हे सिद्ध झाल्याचे नमूद करत हा गुन्हा ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण नोंदवले.

न्यायालयाने तब्बल १३७ पानी निकालपत्रात नमूद केले आहे की, दोन्ही पक्षांचा युक्तिवाद, साक्षीदारांचे जबाब, वैज्ञानिक पुरावे आणि तपासातील सर्व बाबींचा सखोल विचार केल्यानंतर आरोपी दोषी असल्याचे निर्विवादपणे सिद्ध झाले. पीडितेवर अत्यंत अमानुष अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे संविधान आणि विद्यमान कायद्याच्या चौकटीत राहून आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणेच न्यायसंगत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

निकालात यापूर्वीच्या लैंगिक अत्याचार व हत्येच्या प्रकरणांतील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचाही संदर्भ देण्यात आला आहे. गुन्ह्याचे भीषण स्वरूप, पीडितेचे अल्पवय आणि आरोपीने दाखवलेली क्रूरता लक्षात घेता मृत्युदंडाशिवाय अन्य कोणतीही शिक्षा पुरेशी ठरणार नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

नेमके काय घडले होते?
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे १ मे, महाराष्ट्र दिनी साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक न्यायालयात वेगाने खटला चालविण्यात आला.

विशेष म्हणजे, अवघ्या दोन महिन्यांत या प्रकरणाचा निकाल लागला असून, राज्यातील सर्वात जलदगतीने निकाल लागलेल्या गंभीर गुन्ह्यांपैकी हा एक महत्त्वाचा खटला ठरला आहे. या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, समाजातही या निकालाचे स्वागत होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version