Spread the love

राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते नियुक्ती; ‘युवा जोडो’ अभियानाला वेग देण्याचा निर्धार

नाशिक (प्रतिनिधी) : मराठी दूरचित्रवाणी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री गायत्री मोरे यांची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक शहर युवती आघाडी (सांस्कृतिक विभाग) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राज्यभरात रिपब्लिकन चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी विविध स्तरांवर संघटनात्मक बांधणी करत असून, त्याचाच एक भाग म्हणून नाशिक शहरात पक्षप्रवेश आणि संघटन विस्ताराला गती देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गायत्री मोरे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

गायत्री मोरे यांनी अनेक मराठी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या असून, सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतही कार्यरत आहेत. युवा आणि युवतींमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरात युवती आघाडी अधिक सक्षमपणे उभी राहील, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.

नियुक्तीनंतर बोलताना गायत्री मोरे यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीबद्दल आभार व्यक्त केले. नाशिक शहरातील युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात पक्षाशी जोडून संघटना मजबूत करण्यासाठी कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लवकरच ‘युवा जोडो’ अभियानाची सुरुवात करून शहरातील युवक-युवतींचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी खंबीरपणे काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी महाराष्ट्र राज्य युवा नेतृत्व बिपीन कटारे, नाशिक युवा जिल्हाध्यक्ष जितू भाऊ बागुल, सातपूर महिला अध्यक्षा मायाताई कांबळेनितीन बोबडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गायत्री मोरे यांच्या निवडीमुळे त्यांच्या समर्थक आणि नाशिकमधील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version