जिल्हाधिकाऱ्यांकडे पी. एम. पाटील यांची मागणी
जळगाव : धरणगाव तालुक्यातील कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून निधी मिळालेला नसल्याने तो तात्काळ वितरित करावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष पी. एम. पाटील यांनी केली आहे.
पी. एम. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अनेक प्रकरणांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही धरणगाव तहसील कार्यालयातून सुमारे १२० प्रकरणे निधी वितरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवूनही गेल्या सहा महिन्यांपासून संबंधित लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळालेली नाही.
तहसील कार्यालयात चौकशी केल्यानंतर “निधी प्राप्त झालेला नाही” असे सांगितले जात असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे शासनाकडून निधी प्राप्त झालेला नाही की जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर विलंब होत आहे, याबाबत स्पष्टता करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
पी. एम. पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रकरणातील नेमकी अडचण जाणून घेण्याची भूमिका मांडली आहे. लाभार्थी सातत्याने पदाधिकारी, पत्रकार आणि संबंधित कार्यालयांकडे निधीबाबत विचारणा करत असून त्यांच्या अडचणी गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.
कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर संबंधित कुटुंब आर्थिक संकटात सापडते. अशा परिस्थितीत कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा निधी वेळेत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून प्रलंबित १२० लाभार्थ्यांचा निधी मंजूर करून वितरित करावा, तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष पी. एम. पाटील यांनी केली आहे.
