Spread the love

पालखी आगमनावेळी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी, खड्डे बुजविणे, लोखंडी पत्रे हटविणे आणि वाहतूक नियोजनाची मागणी

पालखीपूर्वी मेट्रो कामे पूर्ण करण्याची मागणी | हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीची मागणी | निगडी–पिंपरी मार्गावरील खड्डे तातडीने बुजवा | वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत ८ जुलै २०२६ रोजी आगमन होणार असून, त्यापूर्वी निगडी ते पिंपरीदरम्यान सुरू असलेली मेट्रो रेल्वेची कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी यंदाही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात यावी. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखीचे भव्य आणि उत्साहपूर्ण स्वागत व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, निगडी ते पिंपरीदरम्यान सुरू असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामांमुळे मुंबई–पुणे महामार्गावर अनेक ठिकाणी लोखंडी पत्र्यांचे कंपाऊंड उभारण्यात आले असून, काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. विशेषतः निगडी श्रीकृष्ण मंदिरासमोरील खड्ड्यांमुळे यापूर्वीही अपघात घडल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या संदर्भात गेल्या सहा महिन्यांपासून तक्रारी करूनही संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

पालखी सोहळ्यादरम्यान लाखो वारकरी या मार्गाने पायी प्रवास करणार असल्याने, मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी असलेले खड्डे तातडीने बुजवावेत, तसेच ज्या ठिकाणी लोखंडी पत्र्यांचे संरक्षक कुंपण आवश्यक नाही ते हटवून वारकऱ्यांसाठी मार्ग मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निगडी भक्ती-शक्ती उड्डाणपूल ते निगडी सिग्नल या मार्गावर पालखी सोहळ्यादरम्यान मोठ्या वाहनांना प्रवेशबंदी लागू करावी, अशीही सूचना करण्यात आली आहे. सध्या मेट्रोच्या कामामुळे निगडी भक्ती-शक्ती उड्डाणपूल ते मधुकर पवळे उड्डाणपूल या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, पालखीच्या काळात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तातडीने दखल घेऊन मेट्रो प्रकल्प प्रशासन, वाहतूक पोलीस आणि संबंधित विभागांशी समन्वय साधून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीच्या सुरळीत व्यवस्थेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी नम्र विनंती सचिन काळभोर यांनी केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version