‘विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड चालणार नाही’; आठ दिवसांत कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा
धुळे, प्रतिनिधी : धुळे शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या वेळेत अवजड वाहनांची वाढती वर्दळ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असल्याचा आरोप करत युवा सेनेने वाहतूक विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश मराठे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आठ दिवसांच्या आत ठोस उपाययोजना न झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
युवा सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात रात्री ८ ते सकाळी ९ वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू असतानाही अनेक भागांत नियमांचे खुलेआम उल्लंघन होत आहे. विशेषतः सकाळच्या शाळा सुरू होण्याच्या वेळेत शहरातील प्रमुख रस्त्यांवर ट्रक, डंपर आणि इतर अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर फिरत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
कमलाबाई कन्या शाळा, बाफना शाळा, गल्ली क्रमांक ४, ५ आणि ६, जे. बी. रोड, संपूर्ण पेठ परिसर तसेच साक्री रोडवरील सिंधी कॅम्प परिसरात अवजड वाहनांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे युवा सेनेने निदर्शनास आणून दिले. याच मार्गांवर यापूर्वीही अपघात होऊन अनेक विद्यार्थ्यांचा बळी गेल्याची आठवण करून देत, एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होते आणि काही दिवसांत पुन्हा परिस्थिती पूर्ववत होते, अशी टीकाही करण्यात आली.
विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शहरात वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी युवा सेनेने केली आहे. निवेदनात सकाळी ९ वाजेपूर्वी शहरात कोणत्याही अवजड वाहनाला प्रवेश देऊ नये, शाळा व महाविद्यालये सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा तसेच तहसील कार्यालय चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नियुक्ती करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला की, शहरात लागू असलेली प्रवेशबंदी केवळ कागदोपत्री आहे का? नियम असतानाही अवजड वाहने शहरात कशी प्रवेश करतात, याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास अवजड वाहनांच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवा सेनेने दिला.
हे निवेदन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष योगेश मराठे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अमित खंडेलवाल, शेखर बडगुजर, चेतन धामेच्या, तुषार सातपुते, अनिल ठाकूर, निलेश चौधरी, भूषण पाटील, राहुल ठाकूर, जावेद बेग, जिया अन्सारी, नितीन मराठे, प्रीतम धात्रक, सागर पाटील, प्रवीण मराठे, नितीन धनगर, सुमित चौधरी, शुभम पाटील यांच्यासह युवा सेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
