Spread the love

महिंदळे येथील दिनकर भदाणे यांचा जागीच मृत्यू; दोन गंभीर, १३ जण जखमी, वारीवरून परतताना काळाचा घाला

 डिझेल संपल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रॅक्टरला भरधाव आयशरची धडक • ट्रॉलीत विश्रांती घेत असलेल्या भाविकांवर दुर्घटनेचा घाला • परिसरात शोककळा

भडगाव (प्रतिनिधी) गणेश रावळ ।

आषाढी वारी आटोपून परतीच्या प्रवासाला निघालेल्या वारकरी भाविकांवर मध्यरात्री काळाने घाला घातला. भडगाव तालुक्यातील कजगावजवळ भरधाव गॅसवाहू आयशरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने महिंदळे येथील दिनकर शेनपडू भदाणे (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात दोन महिलांसह एकूण १५ जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील बेलदारवाडी येथून ज्ञानेश्वर माऊलींची आषाढी वारीची दिंडी मार्गस्थ करून काही वारकरी भाविक आपल्या गावाकडे परतत होते. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास कजगाव परिसरात त्यांच्या ट्रॅक्टरमधील डिझेल संपल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उभे करण्यात आले होते. काही भाविक ट्रॉलीत विश्रांती घेत असतानाच मागून भरधाव वेगाने येणाऱ्या गॅस वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनाने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.

धडकेचा आवाज इतका भीषण होता की ट्रॉलीतील भाविकांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही. या अपघातात ट्रॉलीत झोपलेल्या दिनकर भदाणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर भाविक गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर विशेष उपचार सुरू आहेत.

दरवर्षी महिंदळे व परिसरातील शंभर ते दीडशे वारकरी बेलदारवाडी येथून ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीत सहभागी होतात. काही भाविक दिंडीला निरोप देऊन परत गावाकडे येतात. यंदाही ही परंपरा कायम ठेवण्यात आली होती. मात्र परतीच्या प्रवासात झालेल्या या भीषण अपघाताने वारकरी समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृत दिनकर भदाणे हे अत्यंत धार्मिक आणि सेवाभावी स्वभावाचे म्हणून परिसरात परिचित होते. विशेष म्हणजे त्यांचे दोन्ही पुत्र देशसेवेत कार्यरत असून त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलांचा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे महिंदळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

रविवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांसह ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या दुर्घटनेने आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणाला दुःखाची किनार लाभली असून, कजगाव परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताबाबत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version