Spread the love

कचरा वेचताना उघड्या विद्युत तारेचा स्पर्श; पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद

भुसावळ | प्रतिनिधी

भुसावळ बस स्थानक परिसरात कचरा वेचणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २९ जून रोजी सकाळी सुमारे १०.२० वाजता घडली असून, या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत तरुणाचे नाव प्रवीण किसान शिरसोदे (वय २५, रा. हुडको, भुसावळ) असे आहे. तो बस स्थानक परिसरात भंगार आणि कचरा गोळा करण्याचे काम करत होता.

प्राथमिक माहितीनुसार, बस स्थानकातील शौचालयाजवळ उघड्या अवस्थेत असलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने प्रवीणला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो घटनास्थळीच कोसळला. बराच वेळ तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता तो मृतावस्थेत आढळून आला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.

बाजारपेठ पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर जगन्नाथ चाटे (वय ५०) यांनी बस स्थानकाच्या मागील बाजूस एक तरुण बेशुद्ध अवस्थेत पडलेला पाहिला. प्रवाशांकडून चौकशी केली असता त्याची ओळख प्रवीण शिरसोदे अशी पटली. त्याच्या हाताला विद्युत तार लागल्याचे दिसून आले असून, विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी परिसरातील उघड्या विद्युत तारेबाबत निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करत संबंधित यंत्रणेकडून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. मात्र, या आरोपांवर संबंधित विभागाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही.

पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version